आसाम, 26 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे. अशात आसाम सरकारनं 28 जूनच्या मध्यरात्रीपासून गुवाहाटीमध्ये 14 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्व शहर व नगरपालिका प्रभाग शनिवार आणि रविवारी बंद असणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता सर्व दुकानं आणि व्यवहार बंद असणार असल्याचं आसाम सरकारनं जाहीर केलं आहे. आज रात्री राज्यात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, ‘कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे 28 जून रोजी मध्यरात्रीपासून संपूर्ण महानगरात लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल स्टोअर खुली राहतील अशी घोषणा त्यांनी केली आहे. आसाममधील कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन दोन आठवड्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे लॉकडाऊन सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. अनलॉक 1.0चा पहिला टप्पा हा 30 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नियम कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनलॉक २.० मध्ये केंद्र सरकार निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे मंजूर करू शकेल. घरगुती उड्डाण सेवा ठराविक अटींसह काही मार्गांवर सुरू झाल्या आहेत. दरम्यान, देशात कोरोनाचा हाहाकार वाढत चालला असताना गेल्या 24 तासातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला. देशात गेल्या 24 तासांत 17,296 कोरोना विषाणूची नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 407 लोकांचा मृत्यूही झाला आहे. या आकडेवारीमुळे कोरोनाच्या संक्रमित लोकांची एकूण संख्या 4,90,401 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 15301 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2,85,637 लोकांना कोरोनावर मात करून ते बरे झाले आहेत. सध्या देशात 1,89,463 सक्रिय प्रकरणं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाची 4,841 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे राज्याचा एकूण कोरोनाचा आकडा 1,47,741 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मृतांची संख्या 6,931 वर पोहोचली आहे. या संबंधी आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. संपादन - रेणुका धायबर