भोपाळ, 7 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू आहे. आतापर्यंत जगभरात 75000 जणांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती भीतीदायक आहे. मात्र या संकटाच्या प्रसंगी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपलं काम नेटाने करीत आहे. ते कोरोना (Covid - 19) रुग्णांच्या सर्वात जवळ असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मात्र आपल्या जीव पणाला लावून ते दिवस-रात्र रुग्णांची सेवा करीत आहे. मध्य प्रदेशातील डॉक्टर सचिन नायक भोपाळ हे जेपी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करतात. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यात त्यांनी गाडीलाच आपलं घर बनवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कुटुंबाला संक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांचं गाडीत राहणं योग्य आहे. या डॉक्टरांना तीन वर्षांचा मुलगा आहे. पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये यासाठी ते गेल्या 7 दिवसांपासून गाडीतच राहत आहेत. यापूर्वीसुद्धा एका पोलीस अधिकारी लॉकडाऊनदरम्यान ड्यूटीवर असल्याने त्याने घराशेजारील गॅरेलला आपलं घरं केलं होतं. यासारखे अनेक योद्धे जीव पणाला लावून कोरोनाशी लढा देत आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी याबाबत सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. यावर त्यांनी लिहिलं आहे की, ‘कोविड – 19 च्या लढ्यात लढणाऱ्या कोरोना योद्धाचं मी आणि संपूर्ण मध्य प्रदेशची जनता अभिनंदन करते. या संकल्पासह आपण पुढे जाऊ आणि कोरोनाविरोधातील हे महायुद्ध जिंकू. सचिन तुमच्या निष्ठेला सलाम.’ संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे