नवी दिल्ली, 31 जानेवारी: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022) आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आज सकाळी 11 वाजता दोनही सभागृहासमोर अभिभाषण करतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज 2021-22 या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात येईल. तर उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन 2022-23 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी, खासदारांना सभागृहाच्या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले. त्यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी माझ्या सर्व मित्रांचे स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. असे सांगत खासदारांना सभागृहाच्या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘निवडणुका होतील, पण सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत खुल्या मनाने सहभागी व्हावे. या अधिवेशनात आपल्या संसद सदस्यांचे संभाषण, चर्चेचा मुद्दा हा जागतिक प्रभावाचा महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो. सर्व खासदार मोकळ्या मनाने चर्चा करून देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. मी सर्व आदरणीय खासदारांना प्रार्थना करेन की निवडणुका होतील, पण अर्थसंकल्पीय अधिवेशन वर्षभराची ब्लू प्रिंट काढते, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण पूर्ण बांधिलकीने जितके करू तितका देशाचा फायदा होईल. अशी भावना यावेळी मोदींनी व्यक्त केली. आज राष्ट्रपतींचे अभिभाषण आहे आणि उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. निर्मला सीतारामन मंगळवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. गतवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्प पेपरलेस असेल. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 टप्प्यात विभागण्यात आले आहे. पहिला टप्पा 31 जानेवारी, दुसरा टप्पा 11 फेब्रुवारी आणि तिसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू होईल. हे अधिवेशन 8 एप्रिल रोजी संपणार आहे.