नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. आज त्यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याशिवाय मोदींनी प्रणव मुखर्जींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्यासाठी हा फोटो खास असल्याचे सांगितले जात आहे.
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशातील विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. समाजातील प्रत्येक भाग आणि राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या कामातील विद्वत्ता आणि कर्तत्व सर्वांसाठी आदर्शवत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (pranab mukherjee died) यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. (pranab mukherjee age) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची (Covid -19) लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली. अभिजित मुखर्जी यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी यासंदर्भात Tweet सुद्धा केलं आहे.