मुंबई,13 जानेवारी: भाजप नेते जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन मोठा वादंग उठला आहे. विरोधकांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. या प्रकरणात पंतप्रधानांना दोष देता येणार नाही. कारण कदाचित याबाबत त्यांना कल्पना नसावी, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. या वादग्रस्त पुस्तकाशी आपला संबंध नाही हे आज संध्याकाळपर्यंत भाजपने स्पष्ट करावे. पुस्तक मागे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, मी काहीही चुकीचे बोललो नाही. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांबात वंशजांबाबतही प्रेम आहे. शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना कोल्हापूर, सातारा गादीवरच्या लोकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. याबाबत भाजपने हे पुस्तक मागे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. या पुस्तकाशी आमचा संबंध नाही, हेही भाजपने जाहीर करावे. ज्याप्रमाणे दुसरे नरेंद्र मोदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचेही राऊत यांनी सांगितली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला होता. त्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संजय राऊतांची तक्रार केली आहे. काय म्हणाले होते छत्रपती संभाजी राजे…? “उद्धवजी त्या संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करताय. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती निमित्त सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते, अशी त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. दरम्यान, भाजप नेते जयभगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीपर लिहिलेल्या पुस्तकात मोदींची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. भाजपच्या दिल्लीतल्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिवप्रेमींबरोबरच इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपवर टीकेची झोड उठवली जात असून सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काय म्हणाले संजय राऊत.. - नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील तर शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत - भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - महाराजांच्या वंशजांची भूमिका काय? - वंशजांबाबत प्रेम आहे. मी काही चुकीचे बोललो नाही. - शिवाजी महाराज देशाचे दैवत - छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं नेतृत्व - महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा - भाजपने हे पुस्तक मागे घेतले पाहिजे - या पुस्तकाशी आमचा संबंध नाही - कोल्हापूर, सातारा गादीवरच्या लोकांनी भूमिका स्पष्ट करावी - छत्रपतींचे वारसदार भाजपमध्ये आहेत. त्यांनी आधी बोलावं - याचा दोष पंतप्रधानांना देता येणार नाही.