मुंबई, 08 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आता या चर्चेवरून विविध तर्क वितर्कांबरोबरच विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeeo Deshpande) यांनीही असाच चिमटा काढला आहे. (वाचा- ठाकरे-मोदी भेट म्हणजे, ‘आपण एकत्र येऊया, पुन्हा लग्न लावुया’, उदयनराजेंचा आरोप ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणासह राज्यातील विविध विषयांवर जवळपास तासभर चर्चा केली. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र समोर आलेला नाही. संजय राऊत यांनी दोन्ही चर्चा समाधानकारक झाल्याचं म्हटलं आहे. मात्र बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं, यावर आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको.
संदीप देशपांडे यांनी चिमटा काढत केलेल्या टीकेमागं विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या संपूर्ण राजकीय नाट्याची पार्श्वभूमी आहे. विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून वाद झाले होते. जागावाटपावेळी तसं ठरल्याचं शिवसेना सांगत होती. तर भाजपनं त्याला नकार दिला. त्यानंतर अखेर युती तुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. (वाचा- ठाकरे-मोदींच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले,‘मेट्रो कारशेड प्रतिष्ठेचा विषय नाही’ ) हाच धागा पकडत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. या चर्चेमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे तर समोर येण्याची शक्यता नाही. मात्र राज्यातील आधीच उलथापालथ झालेल्या राजकीय वातावरणात आता यामुळं नव्या चर्चांना उधाण येणार हे मात्र नक्की.