कल्याण, 5 जून : तुम्हाला रेल्वेने प्रवास (Local train) करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र हवे असेल तर संपर्क साधा, अशा प्रकारची जाहिरात करणं एका उच्चशिक्षित तरुणाला महागात पडलं आहे. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवास सर्वसामान्यांना बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकाना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र काही सर्वसामान्य प्रवाशांना हेरून त्यांना अत्यावश्यक सेवेतील बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्या २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. धनंजय बनसोडे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मुंबई महापालिकेने आरोग्य विभागाची बनावट ओळखपत्रासह, ओळखपत्र तयार करण्याचे फॉर्म आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा स्ट्म्प, सही शिक्का जप्त केला आहे. रेल्वे न्यायलयाने या आरोपीला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. हे ही वाचा- अनलॉक संदर्भात मुंबईतील नियमावली जाहीर, पाहा काय सुरू काय बंद डोंबिवली येथे राहणारा धनंजय मुंबई महापालिकेच्या फ प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. तीन महिन्यापासून त्याला पगार मिळत नसल्याने पैशाची जमवाजमव कशी करायची या विवंचनेत तो होता. धनंजय याला प्रवासादरम्यान नागरिक ओळखपत्र कोठे मिळेल अशी विचारणा करताना आढळल्याने त्याने तीन दिवसापासून बनावट ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने काम करत असलेल्या कार्यालयातून रबर सही शिक्क्याचा स्ट्म्प आणि कोरे फॉर्म मिळवले. यानंतर त्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वे प्रवास सवलत मिळण्यासाठी कोणाला ओळखपत्र हवे असतील तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोशल मीडियावर केले होते. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने रेल्वे आयुक्तांना पाठवला. रेल्वे आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधत बनावट ग्राहक बनून त्याला कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर पकडले. मागील तीन दिवसात त्याने 6 ओळखपत्र तयार करून दिली असून यातील 4 कार्ड आणि कार्ड बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. शिवाय अशा भूलथापांना सर्वसामान्य नागरिकांनी बळी पडू नये, असं आवाहन कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी केले आहे .