नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : फूड डिलिव्हरी (Food Delivery Service) सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या झोमॅटोनं (Zomato) आता किराणा मालाची (Grocery Delivery) डिलिव्हरी देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने सुरु केलेला हा प्रयोग थांबवण्यामागे अनेक कारणं असून कंपनीच्या हिताचा विचार करूनच या निर्णयाप्रत आल्याचं झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ही आहेत कारणं झोमॅटो कंपनीला फूड डिलिव्हरीचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारावर किराणा मालाची जलद डिलिव्हरी करण्याचा प्रयोग झोमॅटोच्या वतीनं सुरू करण्यात आला होता. मात्र या ऑर्डरची पूर्तता करताना येणाऱ्या मर्यादा, वाईट कस्टमर एक्सपेरियन्स आणि वाढती स्पर्धा या तीन कारणांसाठी आपण सध्या तरी किराणा सामानाच्या डिलिव्हरीची सेवा थांबवत असल्याचं झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. सध्या कुठल्याच प्रकारची किराणा सेवा नाही झोमॅटो प्लॅटफॉर्मवरून सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या किराणा मालाची सेवा कुणालाही दिली जाणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. झोमॅटोनं काही दिवसांपूर्वी ग्रोफर्स या कंपनीतील भागेदारी 10 कोटी डॉलरना म्हणजेच 745 कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र या क्षेत्रातील अनुभवासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या क्षेत्राचा आणि बाजाराचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच यापुढे किराणा मालाच्या डिलिव्हरी व्यवसायात कंपनी उतरेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हे वाचा - सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावलेल्यांना पुढील जूनपर्यंत मिळणार या स्किमचा फायदा 17 सप्टेंबरपासून होणार सेवा बंद 11 सप्टेंबर रोजी झोमॅटोनं त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरना एक पत्र लिहिलं आहे. त्यातील उल्लेखानुसार 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद होणार असल्याचा उल्लेख असल्याचं ‘मनीकंट्रोल’च्या बातमीत नमूद करण्यात आलं आहे. झोमॅटोनं काही निवडक बाजारपेठांमध्ये या सेवेची सुरुवात केली होती. मात्र आता ती बंद होणार आहे. ऑर्डर नोंदवल्यानंतर 45 मिनिटांत सेवा पुरवण्याचा दावा झोमॅटोनं केला होता. मात्र ते शक्य होत नसल्याचं कंपनीला लक्षात आल्यामुळे कंपनीनं तूर्तास ही सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.