नवी दिल्ली, 29 मे : टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या टाटा डिजिटल लिमिटेडने (Tata Digital Ltd) अलिबाबा ग्रुप संचलित देशातील सर्वात मोठी ऑनलाईन किराणा कंपनी बिग बास्केट (BigBasket) मध्ये मोठा हिस्सा घेतला आहे. टाटा डिजिटल ही ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची 100 टक्के मालकी सहाय्यक कंपनी आहे. आज झालेल्या या करारामुळं टाटा समूहाला किरकोळ क्षेत्रामध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतामध्ये व्यक्तिगत उपभोग खर्चामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी किराणा सामानाचा खर्च हाच सर्वात मोठा आहे. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. बिग बास्केट (BigBasket) ही भारताची सर्वात मोठी ई-किराणा कंपनी आहे. त्यांच्यासोबत एक मोठी डिजिटल ग्राहक इकोसिस्टम तयार करण्याची आमची रणनीती अगदी योग्य आहे. कंपनीचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे, असे टाटा डिजिटलचे सीईओ प्रतिक पाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र, या मोठ्या कराराची किंमत सांगितली गेलेली नाही. ई-किराणा हा देशातील सर्वात वेगानं वाढणारा ग्राहक ई-कॉमर्स व्यवसाय आहे. त्याची भारतातील वाढता ग्राहक खर्च आणि डिजिटलायझेशन या क्षेत्राचा विस्तार करण्यास मदत होणार आहे. या कोरोना महामारीच्या काळात अलिकडे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑनलाइन खरेदी लोकांना सुरक्षित वाटत आहे. आजकाल ग्राहक चांगल्या दर्जाच्या वस्तूंची मागणी करत असून या गोष्टी आपल्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोच व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. हे वाचा - LIC पॉलिसी काढली असाल तर ALERT राहा! लुबाडली जाईल तुमची सर्व कमाई वर्ष 2011 मध्ये बंगळुरूमध्ये बिग बास्केट कंपनीची स्थापना झाली. तेव्हापासून त्यांनी आपला विस्तार वाढवत देशातील 25 शहरांमध्ये आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन किराणा व्यवसायात या कंपनीची घौडदौड सुरू आहे. प्रसिद्ध टाटा समूहाने गुंतवणूक केल्यानं त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. बिग बास्केटचे सीईओ हरी मेनन म्हणाले की, टाटा समूहाचा भाग झाल्यानंतर आम्ही आमच्या भविष्यातील कामगिरीबद्दल खूप उत्सुक आहोत. टाटा समूह आमच्याशी जोडला गेला असल्यानं आम्ही ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू आणि कंपनी पुढील विस्तार वाढवत राहू, असं ते म्हणाले.