नवी दिल्ली, 30 जून: फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल (Sachin Bansal) यांनी आपला फ्लिपकार्टमधील सगळा हिस्सा वॉलमार्टला विकल्यानंतर बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रात प्रवेश करत बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली आहे. बन्सल यांच्या कंपनीनं 2019 मध्ये एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंडही खरेदी केला आहे. बन्सल यांची कंपनी पर्सनल इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात आघाडीवर असून नवनवीन योजना आणत असते. नवी म्यूचुअल फंड हा सचिन बंसल्स बीएफएसआयचा एक भाग आहे. बन्सल यांच्या नवी म्युच्युअल फंड कंपनीनं नवी निफ्टी 50 इंडेक्स फंड ही योजना दाखल करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन एंडेड योजना असून, ती 3 जुलै 2021 रोजी खुली होईल आणि 12 जुलै रोजी बंद होईल. निफ्टी निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करुन निफ्टी निर्देशांकानुसार परतावा मिळविणे हे या योजनेचं उद्दीष्ट आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना उपयुक्त आहे. ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त फंड योजना असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. सोमवारी सचिन बन्सल यांनी या या योजनेची घोषणा केली होती. हे वाचा- एका वर्षात गुंतवणुकदारांना केलं लखपती; या शेअरद्वारे चांगल्या कमाईची संधी तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी आणि भागीदारांचे सहकार्य यांच्या मदतीनं कंपनीनं या योजनेतील शुल्क 0.06 टक्क्यांपर्यंत खाली आणलं आहे. सध्याच्या निर्देशांक फंड योजनांमध्ये ते सर्वात कमी आहे. बर्याच एएमसी शुल्क खर्च वाढवत असताना ही कमी खर्चाची फंड योजना दाखल करण्यात आली आहे. निर्देशांक फंडामुळे गुंतवणूकदारांना शेअर्सची निवड करण्यासाठी खर्च करावा लागत नाही. त्यांना या फंडांच्या माध्यमातून व्यावसायिक पोर्टफोलिओ मॅनेजमेन्ट सेवा दिली जाते. शेअर मार्केटमधील थेट गुंतवणुकीच्या तुलनेत सुरक्षित आणि बचत योजनांच्या तुलनेत अधिक परतावा देणारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. त्यामुळं दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंडची शिफारस केली जाते. यामध्ये सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) महिन्याला अगदी 500 रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते. तसंच म्युच्युअल फंडाचे नियमन भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी करते. सेबीच्या मार्गदर्शक सूचना कंपन्या आणि गुंतवणूकदार यांचं हित जपणाऱ्या असतात. त्यामुळं गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्या दोघांनाही सुरक्षितता लाभते. हे वाचा- सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल होणार स्वस्त म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे लाभ मिळवण्यासाठी ही नवीन योजना अत्यंत चांगला पर्याय असून यासाठी तज्ज्ञ व्यावसयिक पोर्टफोलिओ मॅनेजर काम करत आहेत, अशी माहिती नवी एएमसी लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जैन यांनी दिली.