'या' शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पुढे काय होणार? वाचा तज्ज्ञांचं मत
मुंबई, 1 ऑक्टोबर: स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातली सर्वांत मोठी सरकारी बॅंक आहे. बॅंकिंग सुविधांच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केलेली ही बॅंक तिच्या शेअर होल्डर्स अर्थात भागधारकांसाठीदेखील फायदेशीर ठरली आहे. एसबीआयने 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर होल्डर्सना 29 पट रिटर्न दिले आहे. दुसरीकडे जर आपण एसबीआयच्या मार्केट कॅपबद्दल विचार केला तर बॅंकेने पाच लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेनंतर हा टप्पा पार करणारी एसबीआय ही तिसरी सर्वांत मोठी बॅंक ठरली आहे. या वर्षी शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले- एसबीआयच्या शेअर्समध्ये यंदा 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअर्समध्ये अजून वाढ होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्केट तज्ज्ञांनी यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 680 रुपयांची टार्गेट प्राइज निश्चित केली आहे. `एसबीआय`च्या शेअर्सची सध्या किमत 28 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) `बीएसई`मध्ये `एसबीआय`चे शेअर्स 531.05 रुपयांवर क्लोज झाले. शेअर होल्डर्सना दिला 29 पट रिटर्न- `एसबीआय`चे शेअर बॅंकेच्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले सिद्ध झाले आहेत. 14 जुलै 1995 मध्ये एसबीआयचे शेअर 18.59 रुपयांवर होते. ते आज वाढून 531.05 रुपयांच्या स्तरावर पोहोचले आहेत. अशाप्रकारे 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत शेअर होल्डर्सच्या पैशांमध्ये 29 पट वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी 15 सप्टेंबरला या शेअर्सनी सुमारे 578.68 रुपयांची विक्रमी किंमत गाठली होती. मात्र त्यानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे हे शेअर गडगडून 531.05 रुपयांवर आले. हेही वाचा: 5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? पुढील गोष्टींसाठीदेखील बॅंकेची स्थिती आहे चांगली- ‘एसबीआय`च्या मार्केटमधील पुढील परिस्थितीविषयी बोलताना के.आर. चोक्सी ब्रोकरेज फर्मचे विश्लेषक म्हणाले, ``एसबीआयची बँकिंग प्रणाली देशभरात सर्वांत मजबूत आहे. त्यामुळे इतर सरकारी बॅंकांच्या तुलनेत कोणत्याही अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी एसबीआय सुस्थितीत आहे.’ ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार, 2022-24 या आर्थिक वर्षात या बॅंकेचा नफा 29 टक्क्यांच्या `सीएजीआर` ( कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट ) आणि अॅडव्हान्सेस 13 टक्क्यांच्या `सीएजीआर`ने वाढू शकतात. 2024 या आर्थिक वर्षापर्यंत बॅंकेचा आरओए 0.9 टक्के आणि आरओई 15.1 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. या सर्व कारणांमुळे के.आर. चोक्सीने या शेअर्सना ‘बाय’ रेटिंग दिलं आहे आणि याची टार्गेट प्राइस 617 रुपयांवरून वाढवत 680 रुपये केली आहे. म्हणजे थोडक्यात हा शेअर विकत घेण्यासाठी चांगला आहे.