मुंबई, 18 एप्रिल: शेअर बाजारात (Share Market) येणारा आठवडा हा अस्थिरता निर्माण करणारा असू शकतो. विश्लेषकांच्या मते, देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भावाचा परिणाम (coronavirus effect) येत्या आठवड्यात शेअर बाजारात पहायला मिळू शकतो. यासोबतच जागतिक बाजारपेठेतील हालचाली आणि कंपन्यांच्या तिमाहींचे निकाल या सर्वांचा परिणामही शेअर बाजारात जाणवण्याची शक्यता आहे. जियोजीत फायनान्शिअल सर्व्हिसेजचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, “कोरोना महामारी आणि देशातील विविध राज्यांत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे बाजारात अस्थिरता जाणवेल. तसेच कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असून बाजारात खूपच वोलॅटिलिटी पहायला मिळेल.” रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले, “या आठवड्यात एक सुट्टी असल्याने शेअर बाजारातील एक दिवस कमी होईल. कोणतीही मोठी घडामोड नसतानाही एसीसी, एचसीएल टेक, महिंद्रा फायनान्स सारख्या कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. यासोबतच जागतिक बाजारपेठेतील कल यावरही बाजारातील दिशा ठरणार आहे.” आठवड्याच्या शेवटी नेस्ले इंडिया, रॅलिस इंडिया आणि टाटा एलेक्सी या कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. वाचा: Gold Silver Price : 15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं? मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेजचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले, “येत्या काळात स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात उतार-चढाव पहायला मिळेल. बाजाराचा कल हा मुख्यत: कोरोना संक्रमणाचा वेग आणि लसीकरणाची गती या सर्वावर अवलंबून असेल. लसीकरणाने वेग पकडताच हळूहळू कोविड 19वर नियंत्रण येईल आणि परिणामी अर्थचक्राला गती मिळेल.” याशिवय डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची गुंतवणूक आणि कच्च्या तेलाच्या किमती या सर्वांवर देखील बाजाराची स्थिती अवलंबून असेल. सॅमको सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्चचे प्रमुख निराली शाह यांनी म्हटलं, अनेक भारतीय शहरांत लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे बाजारात अस्थिरता राहील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परिस्थिती कायम राहील. गेल्या आठवड्यात बीएसई सेंसेक्स 759.29 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरला.