पणजी 10 ऑक्टोबर: गोव्यातल्या एका कारखान्यात कर्मचारी झोपलेले असताना अमोनिया गॅसची गळती झाली. त्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण गोव्यातल्या MIDCमध्ये असलेल्या सी-फूड प्रक्रिया उद्योगात ही घटना घडली आहे. चारही कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सकाळी या कारखान्यात गॅस गळती सुरू झाली. त्यावेळी कामगार झोपेत होते. त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. गॅस गळती झाल्याचं कळताच एकच धावपळ उडाली. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ज्यांना जास्त त्रास होत होता त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या कारखान्यात असलेल्या प्लाँटमध्ये अमोनियाचा वापर केला जातो. त्या प्लँटचं मेंटनन्स करण्याबाबात नोटीस देण्यात आली होती अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र ही नोटीस दिल्यानंतरही मालकाने योग्य ती काळजी घेतली नाही त्यामुळे वायु गळती झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रक्रिया उद्योगांमध्ये अमोनियाचा वापर केला जातो. मात्र तो योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या वापराबाबत सुरक्षेची मागदर्शक तत्वे आहेत. त्याचं तंतोतंच पालन करावं असे अपेक्षीत असते. मात्र अनेकदा त्या प्लाँटची देखरेख योग्यपद्धतीने होत नाही आणि पुरेशी काळजीही घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात येतो. औद्योगीक क्षेत्रात या आधीही अशा घटना घडल्या आहेत. पोलीस आता घटनेची चौकशी करत आहेत.