मुंबई, 04 मार्च: उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आल्यानंतर आता महाराष्ट्रातील तापमानही वाढत चाललं आहे. याचा सर्वात जास्त फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना बसत आहे. आजही विदर्भासह मराठवाड्यातील विविध ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार करणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वीच विदर्भातील चंद्रपूरातील कमाल तापमानाने देशातील उच्चांक गाठला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाने चाळीशी गाठल्यामुळे यावर्षी त्यांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार आणि वाढती उष्णता, यामुळे येथील नागरिकांना दुहेरी समस्येला तोंड द्यावं लागतं आहे. उन्हात मास्क परिधान केल्याने श्वास घ्यायला नागरिकांना अडचणी निर्माण होतं आहे. त्यामुळे उन्हापासून आणि कोरोना पासून बचाव करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.
आज विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी ओलांडणार आहे. आज चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी याठिकाणी तापमानाचा उच्चांक नोंदला गेला आहे. येथील कमाल तापमान 43.4 अंश सेल्सियस एवढं असणार आहे. तर अकोल्यातील तापमानाचा पारा 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ अमरावती (41.2 अंश सेल्सियस), नागपूर (40.6 अंश सेल्सियस), गडचिरोली (40.4 अंश सेल्सियस) आणि गोंदियातील तापमान 40.2 अंश सेल्सियस एवढं असणार आहे. हे ही वाचा - मोठी बातमी : मंत्रिमंडळाची हाय व्होल्टेज बैठक, लॉकडाऊनबाबत होणार निर्णय काय असेल मुंबईतील तापमान? विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत मुंबईतील तापमान सौम्य असणार आहे. मुंबईसह कोकण विभागात आजचं तापमान 32 ते 34 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वर याठिकाणी नोंदलं गेलं असून येथील किमान तापमान 17 अंश सेल्सियस आहे. त्यानंतर माथेरान आणि बारामतीत अनुक्रमे किमान तापमान 19.2 आणि 19.9 अंश सेल्सियस एवढं आहे.