JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'भुजबळ आज शिवसेनेत असते तर...', पवारांसमोरच ठाकरे नेमकं काय बोलून गेले?

'भुजबळ आज शिवसेनेत असते तर...', पवारांसमोरच ठाकरे नेमकं काय बोलून गेले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं.

जाहिरात

उद्धव ठाकरे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हणाले. “अजित दादा तुम्ही बोलताय की, चार महिने तुम्हाला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. मी थोडं करेक्शन करतो, भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत ते तुम्ही मला आता सांगत आहात, खरंतर तुम्ही मला तेव्हा सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावून दिलं असतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “भुजबळ परत आले तर सोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत काँग्रेसलाही घेऊन आले”, असंदेखील ठाकरे यावेळी म्हणाले. “एक गोष्ट नक्की, आता आम्ही धक्काप्रुफ झालो आहोत. असं म्हणतात की जपानला एखाद दिवळी भूकंप नाही झाला तर लोकं परेशान होतात की, आज काय भाई, पण पहिला आणि मोठा मानसिक धक्का आम्हा कटुंबियांना बसला तेव्हा भुजबळ तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर. माँ, बाळासाहेब यांना धक्का बसला होता. आपल्या कुटुंबातील माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो? हाच मोठा धक्का होता. राग वगैरे तो राजकारणाचा वेगळा भाग होता. पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. त्यातून मानसिकरित्या सावरायला आम्हाला थोडा वेळ लागला”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या. “एक गोष्ट तुम्ही आणखी चांगली केली की, तुम्ही बाळासाहेब असतानाच या सर्व गोष्टी मिटवून टाकल्या. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. वैरभाव हा खूप टोकाचा शब्द झाला. पण मतभेद होते ते मिटवून टाकले ते फार चांगलं झालं. पण त्यावेळी माँ असते तर आणखी चांगलं झालं असतं”, असं खंत ठाकरेंनी व्यक्त केली. ( उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा, आता पुढची रणनीती काय? ) “७५ वर्षे पूर्ण करुन आपण मागे बघतो, प्रत्येकाचं वय हे वाढत असतं. वयाने माणूस मोठा असतो, पण तो ज्यावेळी विचाराने थकतो त्याक्षणी वृद्ध होतो. म्हणून तुम्ही आपलं मन मानायला तयार नाहीत. अशी तरुण मनाची माणसं आहेत. नुसती तरुण असून चालत नाही. तर त्या तरुण मनामध्ये जिद्द असावी लागते. आयुष्यात दोन व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे दोन उत्तुंग व्यक्तीमत्त्व त्यांना लाभली. पण या दोन्ही नायकांचा त्यांनी कधीच दुरुपयोग केला नाही. त्यांच्याकडून जे पाहिजं ते घेवून स्वत:ची वाटचाल स्वत: ठरवली म्हणून भुजबळ साहेब तुम्ही आज तरुण आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“एक नवीन समीकरण आपण अडीच वर्षांपूर्वी जन्माला घातलं, महाविकास आघाडी! हे समीकरण यशस्वीपणे चालून दाखवलं होतं. ते बघितल्यानंतर पोटामध्ये गुब्बारा येणं साहजिकच आहे. तो आल्यानंतर सरकार पाडलं. राजकारणात किती खालच्या दर्जाला जायचं? आधी विधान भवनाची उंचीच वेगळी होती. छगनराव शिवसेनेचे एकमेव आमदार होते तसे वामनराव महाडीक हेदेखील एकमेव आमदार होते. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांना फोन करुन सांगितलं होतं की, बाळासाहेब विधानसभेत तुम्ही काय माणूस पाठवलाय. तो बोलायला उभा राहिला की सारं सभागृह स्तब्ध उभं राहून त्याचं भाषण ऐकत उभं राहत असत”, अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या