डोंबिवली, 19 जुलै 2023 : ठाणे जिल्ह्यात बुधवारी (19 जुलै) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे वाहतूक सकाळी ठप्प झाली. त्याचबरोबर उल्हासनगरलाही पावसाचा दणका बसलाय. नदीची पातळी वाढली सकाळपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे वालधुनी नदी आणि उल्हास नदीच्या पण्याची पातळी वाढली आहे. आजूबाजूच्या घरात पाणी घुसलंय. शहरातल्या सीएचएम कॉलेजजवळही पाणी साचलंय. या कॉलेजकडं जाणाऱ्या पुलाच्या रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा घरचा रस्ता पकडावा लागला. उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं आजूबाजूच्या चाळीतील घरातही पाणी शिरलंय.
लोकल विस्कळीत अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेनं वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते बेलापूर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे अंबरनाथ-बदलापूर रेल्वे अनिश्चित काळासाठी ठप्प, चाकरमान्यांचे हाल वसई विरारमध्येही कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाची दमदार बॅटिंग सखल भागात पाणी साचलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कामावर जाणाऱ्या मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली.