भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 2 जून : दहावीच्या टप्प्यावर आपल्या मुलाने चांगले गुण प्राप्त करावे अशी पालकांना आशा असते. अशातच आपला पाल्य विशेष विद्यार्थी असेल आणि त्याने उत्तम गुण मिळवले तर त्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद जगातील सगळ्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. कारण त्या मुलामागे विशेष कष्ट त्या पालकांनी घेतलेले असतात. डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेत विशेष विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणाऱ्या समृद्धी कुलकर्णी हिने दहावीमध्ये समृद्ध गुण प्राप्त केले आहेत. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये समृद्धीला 83 टक्के गुण मिळाले असून तिने आपल्या पालकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. कसं मिळवलं यश? विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांच्या कलेने त्यांना शिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणे या सर्व गोष्टी खर तर खूप अवघड असतात. समृद्धी विशेष पाल्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यासाठी विविध गोष्टी आम्ही केल्या. तिच्या आवडी निवडी, तिला तिच्या पायावर उभे करणे, थोडे चालायला शिकवणे या सगळ्या गोष्टी करत होतो.
या शिवाय तिचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी तिला स. वा. जोशी शाळेत टाकले. तिच्या शिक्षणाचे स्वप्न आम्ही पाहत होतो. मात्र आमचे हे स्वप्न तिने तिच्या दहावीच्या टप्प्यावर पूर्ण केले. तिचे शिक्षक दोन तास घरी येऊन तिला शिकवत होते. तर शाळेतील शिक्षकांनीही लहानपणापासूनच तिच्यावर विशेष मेहनत घेतली, असं समृद्धीची आई दिपाली सांगतात. विशेष मुलांसाठी बोर्डाकडून काही वेगळे विषय विशेष मुलांसाठी मराठी, इंग्रजी, फिजिओलॉजी हायजीन अँड होम सायन्स, सोशल सायन्सेस, एरिथमॅटिक, कुकरी असे विषय असतात. कुकरीमध्ये समृध्दीने स्वतःच्या हाताने उत्कृष्ठ सँडविच बनवले होते. त्याचबरोबर बाकीच्या विषयांचा अभ्यास आम्ही तिच्याकडून करून घेतला. निकाल कळल्यानंतर कार्यालयात असणाऱ्या तिच्या वडिलांना कळवले. त्यांचाही विश्वास बसत नव्हता. समृद्धीच्या या यशामुळे आम्ही खुश आहोत, असंही समृद्धीची आई दिपाली यांनी सांगितले.