डोंबिवली, 27 जुलै : अभ्यासातील विषय प्रॅक्टिकलमधून समजावून सांगितला तर चांगल्या पद्धतीनं समजतो. विद्यार्थ्यांच्या निरिक्षण शक्तीला, विचारशक्तीला यामधून चालना मिळते. त्यामुळे अनेक शाळा वेगवेगळ्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मुलांना अभ्यास आणि आनंद या गोष्टी मिळतील यावर भर देतात. डोंबिवलीच्या एका शाळेनं विद्यार्थ्यांना भात शेती कशी केली जाते? हे थेट शेतामध्ये जाऊन शिकवलं. काय होता अनुभव? डोंबिवलीच्या लोकमान्य गुरुकुल शाळेनं हा खास उपक्रम राबवला. शेतकऱ्यांनी केलेले कष्ट कळावे. विद्यार्थ्यांचे मातीशी नातं जुळावं यासाठी त्यांना डोंबिवलीजवळच्या दावडीमधील एका शेतावर नेण्यात आलं. भाताची पिके , लाल माती आणि ढोपरभर चिखलात इवल्या इवल्या हातानी केलेली भाताची शेती यामुळे ही मुलं चांगलीच खुश झाली होती.
शेतकरी पीक घेतो, कष्ट करतो म्हणजे तो नक्की काय करतो? या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी ही सहल काढण्यात आली होती. भाताचे पीक कोणत्या ऋतूत काढतात ? त्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे ?पोषक वातावरण काय आहे? या सगळ्यांची माहिती शिक्षिका सुलोचना गोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. शेतकरी शेतात पीक घेण्यासाठी खूप कष्ट करीत असतो. त्यामुळे आपण आपल्या ताटातलं अन्न वाया जाऊ देऊ नये किंवा टाकू नये याचे ही महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पावसाळ्यात पालकाचे भज्जे खाताय? पण शेती कशी होते माहितीये का? कशी होते पेरणी? VIDEO ‘डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. शेती ही देखील एक कला असून मातीत रोप लावणे , त्यांची काळजी घेणे, त्यांना वाढवणे हे विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शेती कशी करावी झाडांची काळजी कशी घ्यावी याची माहिती या माध्यमातून देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीमध्ये गोडी निर्माण होईल. ते देखील भविष्यात शेतीमध्ये नवे प्रयोग करतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.