मुंबई, 22 फेब्रुवारी : आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’, असं संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपांनंतर ठाणे पोलीस संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. संजय राऊत यांच्या प्राथमिक चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजा ठाकूर मार्फत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ऐकीव माहितीच्या आधारे हा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘माझ्यावर राजा ठाकूर हल्ला करणार, तसंच शाई फेकणार अशी माहिती माझ्या विश्वासू मित्राने दिली होती. मी राजा ठाकूरला कधी भेटलेलो नाही, का त्याने कधी मला फोन केला नाही. मी त्याला कधी पाहिले नाही. काही लोकांमध्ये चर्चा झाली, ती चर्चा माझ्यापर्यंत आली म्हणून मी त्याबाबत पोलिसांना सांगितलं,’ असं संजय राऊत पोलिसांना म्हणाले. प्राथमिक चौकशीदरम्यान संजय राऊतांनी हे सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाणे पोलिसांची एक टीम नाशिकला संजय राऊत यांचा जबाब नोंदवायला गेली होती. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत, यामुळे ठाणे पोलिसांची टीम त्यांचा जबाब नोंदवायला गेली होती. राजा ठाकूर समोर दरम्यान संजय राऊत यांनी आरोप केलेल्या राजा ठाकूर यांच्याशी नेटवर्क 18 ने संपर्क केला, तेव्हा त्यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले. याचसोबत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही पलटवार केला आहे. ‘संजय राऊत यांच्या स्वप्नात पण असं दिसत असेल तर याला आपण काय करणार?,’ असं राजा ठाकूर म्हणाले. संजय राऊत तुम्हाला सुपारी दिली असल्याचं म्हणत आहेत, असा प्रश्न ठाकूरना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राऊत लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं शोभतं का? असं उत्तर दिलं. तुमची आणि श्रीकांत शिंदे यांची भेट झाली होती का? असा प्रश्नही राजा ठाकूरना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेनेचं नाव गेल्यापासून ते सगळ्यांवर आरोपच करत आहेत. त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून त्यांचं कामच आरोप करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, अशी टीका ठाकूर यांनी केली.