अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 29 मे : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असते. आपलं लग्न जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं इतरांपेक्षा हटके व्हावा असा अनेकांचा प्रयत्न असतो. लग्नाच्या निमित्तानं होणारं प्रि वेडिंग शूटचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलंय. या प्री वेडिंग शूटवर बंदीचा निर्णय मराठा सेवा संघानं घेतलाय. मराठा वधू-वरांच्या सोलापूरमध्ये झालेल्या मेळाव्यात याबाबतचा ठराव मांडण्यात आला. तो ठराव सर्व उपस्थितांनी एकमतानं संमत केलाय. जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीनं याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येणार आहे.
प्री वेडिंग शूटवर परिस्थिती नसतानाही लाखो रूपये खर्च केले जातात. वैयक्तिक आणि खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा यामुळे रूढ झालीय. या प्रथेला आळा बसला पाहिजे, असं मत या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले. प्री वेडिंग शूटसाठी लागणारा खर्च गरिब घरातील विवावाहासाठी आर्थिक मदत म्हणून देण्याची संकल्पना या मेळाव्यात मांडण्यात आली. ‘एक गाव एक विवाह’ ही संकल्पना भविष्यात मराठा सेवा संघाच्या वतीनं पुढे आणली जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. आई-वडिलांनी मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलाची निवड करावी. साधेपणाने विवाह करावेत, असे ठराव देखील या वधू वर मेळाव्यात मांडण्यात आले. त्याला सर्व समाज बांधवांनी एकमतानं पाठिंबा दिला, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. हातमागावर विणलेल्या कपड्यांची करा खरेदी, हॅण्डलूम एक्स्पोमध्ये आहे सुवर्णसंधी! ‘आमच्या रोजी रोटीचा प्रश्न’ मराठा सेवा संघाच्या या ठरावाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झालीय. ‘कोणत्याही क्षणाचे किंवा प्रसंगाचे छायचित्र टिपणे ही त्या प्रसंगाची मोठी आठवण असते. आपल्या लग्नात कोणत्या गोष्टी कराव्यात याचा निर्णय मुलानं किंवा मुलीनं घेतला असतो. किती रूपये खर्च करावा हा प्रत्येकाच्या हौसेचा विषय आहे. सामाजिक वधू वर सूचक मंडळांनी एकच बाजू लक्षात घेऊन निर्णय घेऊ नयेत, ही विनंती आहे. कोरोनानंतर आत्ताच आमची कमाई होत आहे. त्यामुळे आमच्याही रोजी-रोटीचा विचार करावा, असं आवाहन सोलापूर बहुउद्देशीय फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी केलंय.