अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 19 जून : दक्षिण काशी म्हणून ओळख असणार पंढरपूर शहर हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण भक्तीमय होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन सज्ज झालं आहे. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने 24 जून ते 3 जुलै या कालावधीत रेल्वे प्रशासनाने अगदी चोख नियोजन केले आहे. स्पेशल रेल्वे यंदाच्या वर्षी रेल्वे मार्गाने जाणाऱ्या पालख्यांवर अधिकारी आणि पर्यवेक्षकांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय कुर्डू आणि सरगम चौकात ही विशेष नेमणूक असणार आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी एकूण 181 रेल्वे धावणार असून त्यापैकी 82 रेल्वे या स्पेशल आषाढी वारीसाठी सोडण्यात आल्या आहेत.
त्यापैकी जालना, छत्रपती संभाजीनगर, आदिलाबाद, अमरावती, मिरज, लातूर आणि नांदेड इथून जवळपास 99 फेऱ्या या पंढरपूरच्या दिशेने होणार आहेत. रेल्वे विभागाच्या वतीने जास्त सफाई कामगार शिवाय प्रथम उपचारासाठी विशेष डॉक्टरांची मोठी टीम उभी करण्यात आली आहे. पंढरपूर मार्गावर असणाऱ्या मोठ्या एक्सप्रेस गाड्यांना अधिक डबे यावेळी बसवण्यात आले आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय यावेळी रेल्वे प्रशासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे. शिवाय कोणत्याच भाविकांकडून रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान कोणता अपघात होऊ नये यासाठी विशेष असे रेल्वे पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. परतीच्या प्रवासादरम्यान थकलेल्या भाविकांना तिकिटाच्या रांगेत थांबावे लागू नये यासाठी पंढरपूर रेल्वे स्थानकावर दहा जास्त रेल्वे तिकिटाच्या खिडक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे रेल्वेचे नियोजन करण्यात आले असून यंदाच्या वर्षी कोणत्याच भाविकाला परतीचा प्रवास करते वेळी वाहनांची होणारी गैरसोय याचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता ही मध्य रेल्वे प्रशासनाच्या सोलापूर विभागाने घेतली आहे.
Solapur News : वारीला जाऊया लालपरीने, इतक्या गाड्या आहेत सज्ज, संपूर्ण वेळापत्रक VIDEO
सहकार्य करावे पंढरपूरची वारी ही भक्तीभावाने साजरी करण्यात यावी यासाठी खुद्द रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून अधिक कोणत्या सोयी सुविधा देण्यात येतील यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. शिवाय आमची एकच विनंती आहे की कोणत्याच वारकऱ्यांनी कसल्याच प्रकारचा रेल्वे रूळ क्रॉस करून जाऊ नये एवढेच आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सोलापूर रेल्वे एल के रणयेवले यांनी केले आहे.