सोलापूर तापमान
सोलापूर, 20 एप्रिल : गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याचा अनुभव सोलापूरकरांना येऊ लागला आहे. बुधवारी थेट 42.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यामुळे शहरातील रस्ते ओस पडू लागले असून, आगामी मे महिन्यात याची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. अशातच सोलापुरातील उन्हाचा पारा वाढल्याने एक वेगळाच प्रकार येथून समोर आला आहे. शहरातील सरस्वती चौक येथील सिग्नलवर थांबलेल्या युवकांनी चक्क आपल्या जवळील एका भांड्याच्या साहाय्याने अंगावर पाणी ओतून घेतले. तसेच दुचाकी चालवणाऱ्या आपल्या मित्राच्या डोक्यावर ही पाणी ओतले. हा व्हिडिओ सध्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि याची चर्चा मात्र जोरात रंगली आहे.
दरम्यान, सोलापुरातील पारा 42.2 अंशांवर पोहोचल्याने सूर्यास्तानंतरही दाह कायम आहे. 18 वर्षांपूर्वी 20 मे 2005 रोजी नोंदलेल्या 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे आता 18 वर्षांनंतर तशी परिस्थिती पुन्हा जाणवेल की काय, अशी भिती व्यक्त होत आहे. हवामान विभागाकडून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा - मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्यासारखी अक्षरश: उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. आता मुंबईकरांना हवामान विभागाने इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचं सांगितलं आहे. आधीच ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. मुंबईत बुधवारी ३८. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा दिला आहे. मात्र अजून मे महिना जाणं बाकी आहे. घामाचा धारा आणि अंगाची काहीली होत असल्याने मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत.