JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena vs Shinde : ठाकरेंची निवडणूक आयोगाला 3 लाख प्रतिज्ञापत्र, खरी 'शिवसेना' ठरायला इतका वेळ लागणार?

Shivsena vs Shinde : ठाकरेंची निवडणूक आयोगाला 3 लाख प्रतिज्ञापत्र, खरी 'शिवसेना' ठरायला इतका वेळ लागणार?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. खरी शिवसेना कुणाची हा निर्णय द्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. तसंच दोन्ही गटांना आता वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. ठाकरेंना निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, तर शिंदेंना अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांना नव्या चिन्हासह मैदानात उतरावं लागणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची याचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली, त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनेही जवळपास तीन लाख प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहेत. याची सुरूवात आजपासून करण्यात आली आहे. दोन्ही गटांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केल्यानंतर तसंच कोणाच्या बाजूने कोणते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत, हे पाहिल्यानंतर निवडणूक आयोग खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय देईल. हा निर्णय आल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी एकाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण वापरायला परवानगी मिळेल. हेही वाचा  अन् ‘मातोश्री’वर पोहोचली ‘मशाल’, उद्धव ठाकरे चिन्हाबद्दल पहिल्यांदाच बोलले, VIDEO किती वेळ जाणार? खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याआधी बिहारच्या लोक जनशक्ती पक्षामध्येही अशाच प्रकारे वाद निर्माण झाला होता. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र चिराग पासवान आणि भाऊ पशुपती कुमार पारस यांनी पक्षावर दावा ठोकला. एलजेपीच्या 6 पैकी 5 खासदारांनी चिराग पासवान यांची हकालपट्टी करून पशुपती कुमार पारस यांना नेता म्हणून निवडलं. एलजेपीमधल्या या वादानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. आयोगाने चिराग पासवान यांना एलजेपी (रामविलास) हे नाव आणि हेलिकॉप्टर हे चिन्ह दिलं. तर पारस यांच्या गटाला राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी हे नाव आणि शिवण मशीन हे चिन्ह देण्यात आलं.

जून 2021 मध्ये एलजेपीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला, यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह आणि नावं दिली. निवडणूक आयोगामध्ये वर्षभरानंतरही एलजेपी कोणाची? या वादावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? यासाठी ठाकरे आणि शिंदेंनाही बराच काळ झगडावं लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जरी शिवसेनेबद्दलचा निकाल दिला तरी दोन्ही गटांना पुन्हा सुप्रीम कोर्टामध्येही जाता येऊ शकेल. हे सगळं पाहता शिंदे आणि ठाकरे यांना आगामी महापालिका निवडणुकाही नव्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात. हेही वाचा  शिंदे गट ‘या’ चिन्हाबद्दल आहे प्रचंड आशावादी, शिवसेनेला देईल टक्कर!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या