मुंबई, 11 ऑक्टोबर : ठाकरे-शिंदे यांच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. यानंतर आता दोन्ही गटांना वेगळी चिन्हं आणि नावं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना ही नावं मिळाली आहेत. तर ठाकरेंना धगधगती मशाल आणि शिंदेंना ढाल-तलवार ही चिन्हं निवडणूक आयोगाने दिली. योगायोगाने शिवसेनेला याआधीही मशाल हे चिन्ह मिळालं होतं, त्यावेळी मशाल या चिन्हावर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘माझं वय 75 झालं म्हणजे काय झालं? मी पहिल्या 10-15 शाखा प्रमुखांपैकी एक होतो. डोंगरीपर्यंतचा भाग माझ्याकडे होता. दत्ता प्रधान शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी वॉर्ड वाईज रचना केली,’ असं भुजबळ म्हणाले. हेही वाचा आता रंगणार सामना; धगधगती मशाल विरुद्ध ढाल-तलवार, अखेर शिंदे गटाला मिळालं नवं चिन्ह ‘आमच्या निवडणूक ध्यानी मनीही नव्हती. मुंबई महाराष्ट्रात आहे, मात्र महाराष्ट्र मुंबईत नाही, अशी परिस्थिती होती. पार्टी नोंदणी नसल्यामुळे आमच्याकडे अधिकृत चिन्हं नव्हतं. 1985 साली मी निवडणूक मशाल चिन्हावर शिवसेनेतून लढलो. त्या निवडणुकीत मी शिवसेनेकडून एकटा निवडून आलो होतो. जनरल इलेक्शनमध्ये मी एकटा निवडून आलो होतो. त्यानंतर महापालिकेत निवडणूक लढण्याचं ठरलं आणि खास त्या निवडणुकीसाठी आम्ही मशाल चिन्ह घेतलं,’ असं भुजबळ यांनी सांगितलं. ‘त्यावेळी आमचे 74 नगरसेवक निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरेंनी मला महापौर केलं, त्यावेळी मी एकमेव असा व्यक्ती होतो जो महापौर आणि आमदार होतो. सगळ्यांना वाटायचं की चिन्ह वाघ आहे, पण वाघ काढणं कठीण होतं, मशाल चित्र काढणं सोपं होतं. आता तर करोडो फोन आले आहेत. सोशल मीडिया आहे, त्यामुळे निषाणीचा प्रचार, प्रसार करणं सोपं आहे,’ अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. हेही वाचा ठाकरेंची निवडणूक आयोगाला 3 लाख प्रतिज्ञापत्र, खरी ‘शिवसेना’ ठरायला इतका वेळ लागणार? ‘अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ते नक्की निवडणूक जिंकतील. शिवसैनिक म्हणून सध्या घडत असलेल्या गोष्टी त्रासदायक आहेत. फक्त वाद आणि वादच सुरू आहेत. मुंबई ते दिल्ली सतत वाद सुरू आहेत,’ अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.
‘बेळगाव कारवारसाठी 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं होतं, त्यावेळी महाराष्ट्र पेटून उठला होता. बाळासाहेबांनी काँग्रेससोबत अनेकदा समझौते केले ते अनेकांना माहिती नाहीत. अंतुले यांच्यावेळीही तह झाला होता,’ असं वक्तव्य भुजबळांनी केलं. ‘प्रत्येकाला चिन्ह मिळतं, पण हे चिन्ह मिळालं तरी मत हे जनताच देते. जनताच ठरवते कुणाला निवडून द्यायचं. धनुष्यबाण गोठवला आहे, आता तो कुणाला मिळेल, याचं उत्तर मी कसं देणार, मी काही ज्योतिषी नाही. पण शिंदे गटाने दावा केलाय की त्यांच्याकडे जास्त संख्या आहे, मग त्यांना आता धनुष्य बाण हे चिन्ह का मिळालं नाही,’ असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.