मुंबई, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला असून एनडीएने निर्णायक आघाडी घेतली आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसली तरीही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीसाठी बहुमताचा आकडा दूर दिसत आहे. अशातच शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावत या निवडणूक निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कमी जागा मिळवूनही नितीश कुमार यांना भाजपने मुख्यमंत्रिपद दिल्यास नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानावेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘मुख्यमंत्री तीनदा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकार फेल गेलं आहे, हेच समोर आलं आहे,’ असंही संजय राऊत म्हणाले. ‘तेजस्वी यादव हेच ठरले मॅन ऑफ द मॅच’ ‘बिहारचे सर्व निकाल समोर आलेले नाहीत. रात्री 10-11 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. नितीशबाबू तिसऱ्या नंबरवर आहेत. मॅन ऑफ द मैच तेजस्वी यादव आहेत. कधी कधी मॅच हरल्यावरही त्यातील एकाला मॅन ऑफ द मैच दिली जाते. सर्व निवडणुकीत तेजस्वीचा चेहरा राष्ट्रीय राजकारणात समोर आला. कुणाचाही सपोर्ट नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत एकटा लढत आहे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणुकीत महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या तेजस्वी यादव यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन’ ‘देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रमुख होते. त्यांचे अभिनंदन नक्कीच आहे. पण तेजस्वीनं सर्वांना कामाला लावले, सर्वांना फेस आणला. सुशांत सिंह प्रकरणाचा फायदा झाल्याचे दिसत नाही. मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते,’ असंही संजय राऊत म्हणाले.