मुंबई, 10 जून : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातल्या अंतिम परीक्षेबाबतच्या निर्णयावर राज्यपालांना कोपरखळी मारली आहे. राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ज्ञान कदाचित ऑक्सफर्डपेक्षा जास्त असेल, कारण ऑक्सफर्डसह अनेक मोठ्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या आहेत’, असा सणसणीत टोला पवारांनी मारला. राज्यात विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या का, यावरून मतमतांतरं आहेत. राज्य सरकारने परीक्षा न घेताच श्रेणी पद्धतीचा अवलंब करत वर्षभराच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करावं, असा निर्णय घेतला. पण सर्व विद्यापीठांचे कुलपती (Chancellor) या नात्याने राज्यपालांनी मात्र विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षांचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत राज्य सरकारला खो घातला. यावरून शरद पवार यांनी राज्यपालांना कोपरखळी मारली. ‘ऑक्सफर्डपासून जगातल्या अनेक विद्यापीठांंनी कोरोनाव्हायरच्या साथीमुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातही अनेक ठिकाणी हा निर्णय घेतला आहे. राज्यपालांचं ज्ञान ऑक्सफर्डपेक्षा अधिक असू शकतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय कळवला असेल,’ असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळनं केलेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संकलन - अरुंधती अन्य बातम्या …तर मुंबईत पुन्हा लागू होऊ शकतं Lockdown, उद्धव ठाकरेंनी दिले संकेत लहान मुलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; पालकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष नको राज्यात उद्याच दाखल होणार मान्सून; कुठल्या भागात कधी पडणार सरी?