मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar 80th Birthday) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा,आपणास दीर्घायुष्य लाभो’,अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा 80 वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे, परंतु, सर्व खबरदारी घेवून जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार साहेबांना राजकारणात झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
तसंच ‘आज देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झाले की, लोक म्हणतात, यामागे शरद पवार यांचा हात आहे, पण मी या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, मी असे म्हणेन की जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जण पवार यांच्याकडे या आशेने पाहतो की ते नक्कीच तोडगा काढतील’ असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. हिमालयातील उंचीच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली. तर दुसरीकडे, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.
तसंच, महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.