संजय राऊत
मुंबई, 13 डिसेंबर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. चीनचे सैनिक गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट बघत होते का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. मोदी सरकार देशापासून काहीतरी लपवत आहे. मुद्दा उपस्थित केला की देशद्रोही ठरवलं जात आहे. चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करत असताना सत्ताधारी मात्र राजकारणात गुंतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुणे बंदवर प्रतिक्रिया राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील बंदची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी, अन्यथा हे बंदचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत जाईल असा इशारा राऊत यांनी दिला आहे. राज्यपालांचे राजकीय बॉस गृहमंत्रालयात आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईसाठी अमित शाह यांना पत्र दिलं पाहिजे असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटल आहे. हेही वाचा : … तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार; पंढरपूरमधील नागरिकांचा मोठा निर्णय सीमावादावर प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. सीमावादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून देखील संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. सीमा वादावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर चालता-चालता चर्चा केल्याचं कळतंय. अशी रस्त्यावर चर्चा करणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा संजय राऊत यांनी सीमावादावरून भाजपवर निशाणा साधला आहे.