खेडला महापुराचा विळखा
चंद्रकांत बनकर, रत्नागिरी, 19 जुलै : खेड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी महापुराचा विळखा बसलाा आहे. संपूर्ण खेड शहरातील 3 हजार तर खेड तालुक्यातील 64 गावांमधील 12 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला असून अक्षरशः हाहाकार उडाला आहे. महावितरणने पूर परिस्थिती असलेल्या खेड शहरासह खेड तालुक्यातील 64 गावांमधील 12000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वीज पुरवठा खंडित केले आहे तर अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे युनिट पाण्याखाली गेल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते तर जिल्ह्यातील वाशिष्टी आणि कोदोली या दोन नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. राजापूरची गोदवली नदी ही इशारा पातळीवरून वाहत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीवरून वाहत असून सध्याची या नदीची पातळी 10.40 मीटर एवढी आहे तर जिल्ह्यातील चिपळूण मधील वाशिष्टी नदी ही इशारा पातळीवरून वाहत असून या नदीच्या पाण्याची पातळी 5.56 मीटर आहे. राजापूरच्या गोदवली नदी ही देखील इशारा पातळीवरून वाहत असून या नदीच्या पाण्याची पातळी 5.10 मीटर इतकी आहे. जगुडी नदीने धोकाची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहरात पूर आला असून अनेक ठिकाणचा संपर्क देखील तुटला आहे अनेक ठिकाणचे मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे शासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.