पुणे, 21 जुलै : महाराष्ट्रात (Maharashtra Politics) मागच्या एका महिन्यात झालेल्या राजकीय भुकंपाचे हादरे अजूनही शिवसेनेला बसत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार गेले आहेत. याशिवाय माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे शिवसेनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेससमोरही (NCP) अडचण निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे 2024 साली सुप्रिया सुळेंसाठी (Supriya Sule) बारामतीची (Baramati Loksabha) जागा कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ आहेत, ज्यात बारामती शह, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर यांचा समावेश आहे. 2014 साली मोदी लाटेमध्ये सुप्रिया सुळे 50 हजार मतांनी निवडून आल्या, पण 2019 साली त्यांची आकडेवारी दीड लाखांनी वाढली. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांची पत्नी कांचन कुल (Kanchan Kul) या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीमधून उभ्या होत्या. 2019 ला सुप्रिया सुळेंना बारामती शहरातूनच मोठी आघाडी मिळाली. सुप्रिया सुळेंना बारामती शहरात जवळपास पावणेदोन लाख मतं मिळाली, तर कांचन कुल यांना फक्त 47 हजार मतं पडली. बारामतीनंतर सुप्रिया सुळेंना सगळ्यात मोठं मताधिक्य इंदापूरमधून (Indapur) मिळालं. सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये 1,23,573 तर कुल यांनी 52,635 मतं घेतली. भोरमध्ये सुप्रिया सुळेंना 1,09,163 आणि कांचन कुलना 90,159 मतं मिळाली. पुरंदरमध्ये सुळेंनी 1,04,872 आणि कुल यांनी 95,191 मतं घेतली. तर खडकवासलामध्ये सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला, या भागातून त्या 65 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. तर दौंडमध्येही त्यांना कुल यांच्यापेक्षा 7 हजार कमी मतं मिळाली. कुल यांनी 91,171 तर सुप्रिया सुळे यांनी 84,118 मत घेतली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे बारामती वगळता इतर 5 विधानसभा क्षेत्रांमधली राजकीय गणितं बदलली आहेत, ज्यासाठी राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळेंना आतापासूनच मोर्चेबांधणी करावी लागू शकते. इंदापूरमधून काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2019 निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे सुळेंना इंदापूरमध्ये महत्त्वाची आघाडी मिळाल्याचं बोललं जातं. पण विधानसभेवेळी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर फक्त 3 हजार मतांनी पराभव झाला. यावेळी इंदापूरमध्ये आघाडी घेणं सुप्रिया सुळेंसाठी आव्हानात्मक असेल. पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे पुरंदरचे (Purandar) विजय शिवतारेदेखील (Vijay Shivtare) एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. 2019 निवडणुकीमध्ये शिवतारेंचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. पुरंदर विधानसभा मागच्या बऱ्याच काळापासून पवारांच्या ताब्यात आलेली नाही. तसंच शिवतारे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जवळचे समजले जातात. बारामती लोकसभेमध्ये येत असलेल्या दौंड मतदारसंघामधून राहुल कुल हे 2014 आणि 2019 साली भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडून आले. एकेकाळी पवार कुटुंबाच्या जवळ असणारे राहुल कुल आता देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुल यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. 2019 ला या मतदारसंघातून सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या. भोर (Bhor) मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना छोटी आघाडी मिळाली. या मतदारसंघात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी सुप्रिया सुळेंना आघाडी मिळवून देण्यात मोठी मदत केली, पण 2020 नंतर थोपटे आणि पवार यांच्यातले संबंध खराब झाल्याचं बोललं जातं. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, यानंतर या पदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर होतं. पण महाविकासआघाडी सरकार असताना परत विधानसभा अध्यक्षाची नेमणूकच झाली नाही. थोपटे समर्थकांनी यासाठी शरद पवारांना जबाबदार धरलं. थोपटेंची नाराजी अशीच कायम राहिली, तर याचा फटका सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. बारामतीमधला शेवटचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या खडकवासलामध्ये राष्ट्रवादी सगळ्यात कमकुवत आहे. सुप्रिया सुळे या भागात 2019 ला 65 हजार मतांनी पिछाडीवर होत्या. विधासनभा निवडणुकीतही भाजपचा खडकवासलामध्ये विजय झाला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित पूर्णपणे बदललं आहे, त्यामुळे दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानलं जात आहे.