JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Palghar News : मला माफ करा मी तुमचे दागिने चोरले, इमोशनल चोराने 15 तोळं सोनं केलं परत

Palghar News : मला माफ करा मी तुमचे दागिने चोरले, इमोशनल चोराने 15 तोळं सोनं केलं परत

घरफोडी करून तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक किमतीचं चोरी केलेलं सोनं चोरट्याने परत केलं आहे. हे सोनं परत करताना चोराने चिठ्ठी लिहून माफीही मागितली आहे.

जाहिरात

पालघरच्या चोराला फुटला पाझर, चिठ्ठी लिहून परत केलं सोनं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 7 जून : घरफोडी करून तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक किमतीचं चोरी केलेलं सोनं चोरट्याने परत केलं आहे. हे सोनं परत करताना चोराने चिठ्ठी लिहून माफीही मागितली आहे. पालघरच्या केळवे भागामध्ये ही घटना घडली आहे. माझ्याकडून अनावधानाने चूक झाली असू मला माफ करा, असं चिठ्ठीमध्ये चोराने लिहिलं. या आरोपीने फिर्यादी महिलेच्या माहेरच्या घराच्या ओट्यावर सोनं आणि चिठ्ठी ठेवली. हा प्रकार काहीसा अचंबित करणारा असला तरी पोलिसांच्या जनसंवाद अभियानाचं हे यश असल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेची परिसरामध्ये जोरदार चर्चा आहे. पालघर मधील केळवे येथील मांगेला वाडीत तांडेल दांपत्य मागील अनेक वर्षांपासून राहतात. 60 वर्षीय प्रतीक्षा तांडेल या गृहिणी असून त्यांचे पती ठकसेन तांडेल हे एका बँकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. 31 मे रोजी तांडेल दाम्पत्यांच्या लग्न केलेल्या मुली माहेरी आल्याने जेवण करून हे सर्व कुटुंब घराचा दरवाजा बंद करून शतपावलीसाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलं, मात्र घरी परतताच आपल्या घरात काहीतरी विपरीत घडल्याचं तांडेल दांपत्याला लक्षात आलं. कपाट उघडून बघितलं तर कपाटातील तब्बल 15 तोळं सोन चोरीला गेलं होतं . हे पाहून तांडेल दांपत्याच्या पायाखालची जमीन सरकली. आयुष्यभराची कमाई तांडेल दाम्पत्यांनी सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यामुळे तांडेल दांपत्य हतबल झालं आणि त्यांनी केळवे पोलीस ठाण्यात आपल्या घरात घरपोडी झाल्याची तक्रार नोंदवली. फिर्याद मिळताच केळवे पोलिसांनी तपास सुरू केला . शतपावलीसाठी गेलेलं तांडेल दांपत्य हे अवघ्या 20 मिनिटात घरी परतल्याने या 20 मिनिटातच हा चोरीचा प्रकार घडला असून चोरी करणारा हा जवळपासचाच कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना बळावला, त्यामुळे पोलिसांनी परिसरातील नागरिकांना एकत्र बोलवत भावनिक साद घातली.

कोळी समाजाची एक वेगळी ओळख असून काहीही झालं तरी या समाजातील लोक चोरी करणार नाही, त्यामुळे चोरीचा कलंक आपल्या समाजाला लावून घेऊ नका, असं भावनिक आवाहन परिसरात पोलिसांनी केलं, त्यानंतर अवघ्या तीन दिवसात प्रतीक्षा तांडेल यांचे भाऊ विश्वनाथ तांडेल यांच्या घराच्या वरंड्यावर रात्रीच्या सुमारास चोरट्याने सोनं आणून ठेवलं. या सोन्या सोबत एक चिठ्ठी देखील होती. माझ्याकडून अनावधानाने ही चूक घडली असून मला माफ करा, मी चोरलेल सोनं समुद्रकिनाऱ्यालगत गाडून ठेवलं असल्याने त्यातील एक कॉइन गहाळ झाला आहे , त्यामुळे मला माफ करा. मी तुमचा नातेवाईक आहे, अशी चिठ्ठी ठेवून या चोरट्याने फिर्यादींच सोनं परत केलं, त्यामुळे पालघर पोलिसांच्या सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाच हे यश असल्याचं पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं चोरी झालेलं सोनं हे परत मिळेल याची तांडेल दांपत्यांना आशा कमीच होती . मात्र आपल्या आयुष्यभराची कमाई अवघ्या 20 मिनिटात चोरी झाल्याने तांडेल दांपत्याला मोठं दुःखही झालं होतं . त्यामुळे सोन परत मिळाल्याने झालेलं समाधान हे न सांगण्यासारखं असून पोलिसांचे आभार मानताना तांडेल दांपत्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या