ठाणे, 17 फेब्रुवारी : ठाणे स्थानकातून (Thane Station) प्रवाशांना तत्काळ रिक्षाने प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई-रिक्षा धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आखलेला खासगी ई-रिक्षाचा (electric auto rickshaw) हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून तो लवकरच सुरू होणार आहे. भारतातील रेल्वे स्थानकामधील पहिले बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग स्टेशन आणि स्वॅप बॅटरी तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचे स्टेशन मध्य रेल्वेने उभारले आहे. सध्या ठाणे स्थानकात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेले हे स्टेशन येणाऱ्या काळात सर्व मोठ्या स्थानकांवर असेल. तसंच याठिकाणी खासगी 3 चाकी आणि दुचाकी गाड्या चार्ज करता येतील. या चार्जिंग स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे, मध्य रेल्वेने लिथ पॉवर या 30 इलेक्ट्रिक रिक्षा याठिकाणी सुरू केल्या आहेत. या इलेक्ट्रिक रिक्षा महिला चालवणार आहेत. त्यांची खासियत म्हणजे, या रिक्षा इलेक्ट्रिक जरी असल्या तरी त्या चार्जिंग करण्यासाठी या स्टेशनवर तासभर उभ्या करून ठेवाव्या लागणार नाहीत. त्यांची बॅटरी संपल्यास ती बॅटरी काढून दुसरी पूर्ण चार्ज असलेली बॅटरी त्याठिकाणी लावता येईल. त्यामुळे केवळ दोन मिनिटात रिक्षा पुन्हा फिरण्यास सज्ज होईल. एका पूर्ण चार्ज बॅटरीवर रिक्षा 60 किलोमीटर प्रवास करू शकते. तसंच ही रिक्षा 350 किलो वजन वाहू शकते. कोणताही आवाज न करता पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या या रिक्षा चालवण्यासाठी महिलांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका जपानी कंपनीच्या तंत्रज्ञानावर या रिक्षा धावणार आहेत.मुंबईसारख्या परिसरात वाढणारे प्रदूषण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. अनेकदा या थांब्याबाहेर रिक्षाचालक येऊन प्रवाशांची वाट अडवीत असतात. नव्याने ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांना मीटरपेक्षा जादा दर आकारून लुटण्याचे प्रकारही शहरात घडले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरल्याक्षणी रिक्षांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. जवळ जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी ई-रिक्षांच्या बॅटरीही चार्ज करण्यात येतील. या रिक्षासेवेमुळे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीलाही आळा बसू शकेल.