मुंबई, 24 डिसेंबर : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला होता. त्यावर ‘हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ. भाजपाने जनतेला हेलपाटे मारायला लावले,’ असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर पलटवार केला. ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं. ‘विरोधात बसल्यावर त्यांना असं बोलणं क्रमप्राप्त आहे. पण आम्ही हेलपाटे न घालता कर्जमाफी देऊ,’ असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल भाष्य ‘मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्यवेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. काँग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल,’ असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला नवा मुहूर्त, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? NRC आणि CAA आंदोलनाबद्दल काय म्हणाले जयंत पाटील? ‘एनआरसी कायद्यासाठी डिटेशन सेंटर जर भाजपने उभे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते रद्द करू. असे डिटेंशन सेंटर उभे केले जाणार नाही. पण कोणी कोणास मारहान करू नये. त्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्याचवेळी सोशल मिडीयावर ट्रोल करताना भाषा जपून वापरली पाहिजे,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.