JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उदयनराजेंच्या अडचणी वाढणार? राष्ट्रवादीचे 'हे' 4 दिग्गज आव्हान देण्याच्या तयारीत

उदयनराजेंच्या अडचणी वाढणार? राष्ट्रवादीचे 'हे' 4 दिग्गज आव्हान देण्याच्या तयारीत

निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. उदयनराजेंना पराभवाची भीती? ‘खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,’ या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द शरद पवारांनी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंसाठी आगामी पोटनिवडणूक सोपी असणार नाही. कारण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी त्यांचं सख्य नाही. त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झाला. उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असला तरी पोट निवडणुकीतील संभाव्य निकालाविषयी उदयनराजेंच्या समर्थकांनाही खात्री नाही. ही सगळी परिस्थिती पाहता आगामी काळात साताऱ्यातील राजकारण मोठं रंजक होणार आहे. SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या