बँक लुटण्यासाठी भिंतीला भगदाड पाडलं, पण झालं हसं
बब्बू शेख, प्रतिनिधी येवला, 29 मार्च : नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येवल्याच्या जळगाव नेऊरमधल्या शाखेमध्ये चोरी करण्याचा हा प्रयत्न झाला आहे, पण बँकेमध्ये रोकडच नसल्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस तपास सुरू केला आहे. येवल्याच्या जळगाव नेऊर येथे छत्रपती संभाजी नगर मार्गावर नाशिक जिल्हा मध्ये बँकेची शाखा आहे. या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी रात्री बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला.
बँकेच्या आत गेल्यानंतर चोरांनी रोख रक्कम शोधली, पण बँकेत पैसेच नसल्यामुळे दरोडेखोरांचा डाव फसला आणि ते रिकाम्याहाती निघून गेले. यानंतर सकाळी कर्मचारी बँकेमध्ये आले तेव्हा त्यांना भिंतीला मोठं भगदाड पाडण्यात आल्याचं निदर्शनास आलं. यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आता याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसंच पोलीस पुढील तपास करत आहेत.