नाशिक क्राईम न्यूज
लक्ष्मण घाटोळ, नाशिक प्रतिनिधी, 26 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून नाशिक रोड परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातला होता. गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिकरोड परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या गुंडांची भर पावसात चांगली धिंड काढण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांची नाशिकरोड परिसरातून जाहीर धिंड काढण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची भीती पोलिसांनी दूर करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस विहितगाव आणि धोंगडे मळा येथील दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ करून गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या वेळीच मुस्क्या आवळल्या आहेत. नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव भागात गुन्हेगारांची धिंड काढली.