घटनास्थळाचा फोटो
वाशिम, 1 मार्च : राज्यात सध्या लगीनसराई सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी लग्नसोहळे पार पडत आहेत. त्यातच वाशिम जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याचेही येत्या आठवड्यात लग्न होते. मात्र, त्याआधीच त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमकी घटना - शेत शिवारात रात्री पिकाच्या रक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रान डुकरांनी हल्ला केला. रान डुकरांच्या या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील तऱ्हाळा येथे ही घटना घडली. गणेश बाईस्कर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश बाईस्कर हे शेतातील हरभऱ्याच्या रक्षणासाठी रात्री गेले होते. आज सकाळी शिवारातील शेतकऱ्यांना गणेश बाईस्कर यांचा मृत्यू झाल्याचे दिसले. येत्या आठवड्यात गणेश बाईस्कर यांचे लग्न असल्याची माहिती आहे. नवीन संसाराची स्वप्ने रंगवीत असलेल्या या युवा शेतकऱ्याचा रान डुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. हेही वाचा - बस स्थानकावर रोड रोमिओचे विकृत कृत्य, लोकांनी धू धू धुतले शेतीच्या वादातून कोल्हापुरात शेतकऱ्याची हत्या - कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, कागल तालुक्यातील मौजे सांगाव या गावात शेतीच्या रस्त्यावरून झालेल्या वादात शेतकऱ्याचा खून करण्यात आला. याबाबत कागल पोलिसांना 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या कागल तालुक्यातील मौजे सांगाव काल शेतीच्या वादातून मारहाणीत एकाचा जीव गेला. शेतातील रस्त्याच्या वादातून झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेले शेतकरी मारुती हरी पाटील (वय 65) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत कागल पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती.