महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा, नेते मोबाईलमध्ये बिझी
नागपूर, 16 एप्रिल : महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडली, पण या सभेत महाविकासआघाडीची वज्रमूठ नक्की घट्ट होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सभेच्या आयोजनाची जबाबदारी काँग्रेसवर होती, पण काँग्रेसमध्येच नाराजी नाट्य दिसून आलं. मागच्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या नितीन राऊत यांना तुम्ही सभेला जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी मौन बाळगलं आणि हात जोडून ते निघून गेले. दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनीही आपण सभेला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने वज्रमूठ सभेला उपस्थित राहता येणार नाही, असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वज्रमूठ सभेत भाषण केलं. नानांच्या भाषणावेळी व्यासपीठावर बसलेले महाविकासआघाडीचे नेते मोबाईल बघण्याच बिझी होते. याचा व्हिडिओ आता समोर येत आहे. नाना पटोले भाषण करत असताना आदित्य ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे व्यासपीठावर मोबाईल पाहत होते. मोबाईल पाहून झाल्यानंतर संजय राऊत खुर्चीवरून उठले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलण्यासाठी गेले.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच मैदानामध्ये आलेले लोक निघून जातानाचं चित्रही दिसत होतं, यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात मैदानातल्या काही भागातल्या खुर्च्याही रिकाम्या दिसत होत्या. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडी वज्रमूठ सभा घेणार आहे. यातली पहिली सभा छत्रपती संभाजी नगरमध्ये झाली, तर दुसरी नागपुरात होती. यानंतर 1 मे रोजी मुंबईमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, तसंच पुण्यातही वज्रमूठ सभा होणार आहे.