नवाब मलिक जेलमध्ये तर मग अजित पवार बाहेर का? असदुद्दीन ओवैसी यांचा सवाल
मुंबई, 27 फेब्रुवारी : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहेत. त्याच मुद्द्यावरुन आता एमआयएमचे खासदार असदुदीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं पहायला मिळत आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) रणधुमाळीत असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत भाषण करताना अजित पवारांवर (Dycm Ajit Pawar) निशाणा साधत प्रश्न उपस्थित केला आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, आझम खान हे अखिलेश सरकारमधील मंत्री होते, मुख्यमंत्री अखिलेश होते आणि आझम खान मंत्री होते. आता आझम खान जेलमध्ये आहेत तर मुख्यमंत्री अखिलेश बाहेर का आहेत? द्या उत्तर… तसंच महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. हे काय सुरू आहे? तुमचा नेता असेल तर लढेल हे समजा तुम्ही. भाजपसह सपा-बसपावर निशाणा प्रचारसभेत भाषण करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. आता नोकऱ्या देण्याऐवजी शेणखतापासून पैसे कमावण्याचे सूत्र सांगत आहेत. दुहेरी इंजिन असलेलं हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहेत. सपा आणि बसपा यांनी फक्त मते घेतली पण काम केली नाहीत. ज्यांचा नेता नाही त्यांचा आवाज नाही. वाचा : नवाब मलिक यांची चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनीच उचलली, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी म्हणाले, भाजप मोफत रेशन देण्याची चर्चा करते. असं करुन काही उपकार करत नाहीयेत आपल्याच टॅक्सचा पैसा वापरुन देत आहेत. भाजपच्या सरकारमध्ये दलित, मागास, अल्पसंख्यांकांचे शोषण होत आहे. बाबूसिंह कुशवाहा, छगन भुजबळ जेलमध्ये राहिले तर बाकीचे नेते मोकळेपणे फिरत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्याबाबतीतही तेच झाले. समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आझम खान सुद्धा तुरुंगात गेले आणि सपा प्रमुख अखिलेश यादव बाहेर आहेत. नवाब मलिकांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही - भुजबळ नवाब मलिक यांना अटक झाल्यावर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. त्यानंतर शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी गेले होते. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. मलिक यांच्या राजीनामा घेण्याचा काही प्रश्न नाही. गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. भाजपचे नेते नारायण राणे यांनाही अटक झाली होती, पण त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही, मग मलिकांचा राजीनामा का घ्यायचा? असा उलट सवाल भुजबळांनी केला.