मुंबई, (विनोद राय) 29 सप्टेंबर : भिवंडीत व्यापाऱ्याच्या गाडीची काच फोडून त्यात ठेवलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या बॅगेत व्यापाऱ्याने 3 लाखांची रोकड ठेवली होती, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भिवंडीतील दापोडा कॉम्प्लेक्समधील हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.
यामध्ये तीन चोरटे दुचाकीवरून येताना दिसतात. यानंतर ते रस्त्याच्या कडेला उभे असलेले काच फोडून नोटांनी भरलेली बॅग घेऊन दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहेत. व्यापारी बँकेतून 3 लाखांची रोकड घेऊन येत होते आणि रोकड भरलेली बॅग गाडीत ठेवून रस्त्याच्या कडेला असलेल्या टॉयलेटला गेला असता, या चोरट्यांनी बॅगेवर हात साफ केला.
हे ही वाचा : निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मुंबई NCB ची मोठी कारवाई तब्बल 13 कोटींचे ड्रग्स जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, नारपोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दापोडे येथील वाहतूक व्यावसायिक अनिल पाटील यांनी आपल्या कारमध्ये भारतीय कॉर्पोरेशन गोदाम परिसरातून आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली तीन लाख रुपयांची रक्कम बँकेतून आणली होती. त्यावेळी त्यांनी हे पैसे त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्ड बॉक्समध्ये ठेवले होते. यादरम्यान जवळच्या इमारतीच्या बाथरूममध्ये ते गेले.
या दरम्यान त्यांच्या देखरेखीखाली दोन दुचाकींवर आलेल्या तीन चोरट्यांनी पार्क केलेल्या कारच्या दरवाजाची काच फोडली, तेथून डॅशबोर्ड बॉक्समधील तीन लाख रुपयांची रोकड चोरून पळ काढला. याप्रकरणी पाटील यांनी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : 4 रिक्षांना धडक देत झाडावर आदळला कंटेनर, नागरिकांच्या अंगावर कोसळलं झाडं, पुण्यातील अपघाताचा VIDEO
भिवंडीत 24 तासांत दोन घटना…
कोंबडापारा येथील ग्रीन पार्क इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणारे राजेंद्र अर्जुन बोला यांच्या घरात दहा दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला, घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. 2 लाख 42 हजार रुपयांची चोरी झाल्याची असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बाब घरमालकाला कळताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.