एसटी बस
मुंबई, 23 मे : राज्यात मागच्या वर्षी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यातील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकिट दरात 50 टक्के सूट. महिलासंदर्भातील हा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. यानंतर 17 मार्चपासून तो लागू करण्यात आला. त्यामुळे मागील दोन महिन्यातील या महिला सन्मान योजनेच्या आकडेवारीसंदर्भात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. यानंतर ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आली. सध्या या योजनेच्या माध्यमातून दररोज सरासरी 17 ते 18 लाख महिला 50 टक्के दरात प्रवास करत आहेत. आतापर्यंत 10 कोटी 50 लाख महिला प्रवाशांनी महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रवास करत 50 टक्के प्रवासी तिकीट सवलत घेऊन प्रवास केला आहे. तसेच या महिला सन्मान योजनेमुळे दैनंदिन प्रवासी संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबतच या योजनेमुळे आतापर्यंत महिलांची तिकीट दरातील बचत ही 300 कोटी रुपये झाली आहे. गेल्या दोन महिन्यात या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला एसटी बसने प्रवास करत आहेत. राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून मागील दोन महिन्यात एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी भोसले यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी एसटीतून 50 टक्के सवलत दरात प्रवास करणारी ही योजना निश्चितच बळ देईल, अशी शासनाची भूमिका आहे. 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिक आणि महिला यांना लालपरी म्हणजेच साध्या बसपासून ते नव्याने सुरू झालेल्या ई-शिवनेरी पर्यंत प्रवासात सवलत मिळत आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील नोकरदार महिला, शेतमजूर, छोट-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला, भाजी विक्री करणाऱ्या महिलांना या योजनेचा विशेष लाभ झाला आहे. यानंतरही राज्यातील सर्व जेष्ठ नागरिक आणि महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.