JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे 'सुळे' वेगळे : राज ठाकरे

सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे 'सुळे' वेगळे : राज ठाकरे

“सुप्रिया सुळे यांनी काही बोलायचे नाही. यांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहे”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेत (MNS Thane Uttar Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीचा (ED raid) उल्लेख करत शरद पवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “सुप्रिया सुळे यांनी काही बोलायचे नाही. यांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहे”, असा घणाघात राज ठाकरे यांनी यावेळी केला. “अजित पवारांकडे रेड पडते. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड पडते. त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधूर संबंध असतात. हे कसं काय? पवारांना बोलताना भडकलेलं मी कधी बघितलं नाही. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा सगळ्यांच्या शेपट्या आतमध्ये होत्या”, असं राज ठाकरे म्हणतात. “मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का? कारण महाराष्ट्रात एकेक जण पोहोचवला की शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचतात. पुढचा माणूस सांगायला. अनिल देशमुख गेले, त्यानंतर परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. रेड पूर्ण झाल्यानंतर परत एक भेट घेतली. नवाब मलिक फाजिलपणा जरा जास्त करत आहेत, थोडसं लक्ष द्या. मग नवाब मलिक. मलिकांचं झालं, परवा राज्यसभेतल्या सर्व खासदारांचा एकत्र फोटो काढला. त्यानंतर हळूच जाऊन परत एकदा भेटले. मग संजय राऊतांबद्दल बोलले, असं म्हणे. आत काय बोलले माहिती नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाला बोललो होतो की, पवार खूश झाले की भीती वाटायला लागते. शरद पवार आज संजय राऊतांवर खूश आहेत. पण कधी टांगलेलं दिसेल कळणार नाही. यामध्ये अनेक काँग्रेसवाले गेले आहेत. उशिरा समजतं”, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली. ( ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरेंनी केली अजित पवारांची बोलती बंद, हनुमान चालीसा लावणारच! ) “मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला असं ते बोलत आहेत. मी ट्रॅक बदलेला नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. माहिती करुन घ्यायचीच नाही. ILFS कंपनीत मी होतो. त्या कंपनीतून मी एक वर्षाने बाहेर पडलो. म्हणजे कुणी व्यावसायही करायचा नाही का? त्या कंपनीची चौकशी निघाली तेव्हा मला ईडीची नोटीस आली. त्यातूनच मी ईडी चौकशीला सामोरं गेलो. शरद पवारांना नुसती चाहूल लागली ईडी नोटीस येतेय म्हणून केवढं नाटक केलं त्यावर. या हातांनी काही पापच केलेलं नाही. नोटीशी कोणत्याही येऊदेत त्या राजकीय असूदे किंवा कायदेशीर असूदे, त्यांना भीक घालत नाही”, असं राज म्हणाले. जयंत पाटलांवरही निशाणा “जंत पाटील यांना काहीही सांगा. चकीत चंदू, एकदा त्यांना भेटलो होते, बेहराम पाड्यात जाऊन पाहा, तिथे शस्त्र असतील, बॉम्ब असतील, काय सांगता”, असं म्हणत राज ठाकरे यांनी जयंत पाटलांची मिमिक्री केली. “म्हणे, संपलेला पक्ष, येऊन पाहा कसा आहे आमचा पक्ष, जंत राव हा विझलेला पक्ष नाही, समोरच्यांना विझवणारा पक्ष आहे. हे काय सांगता यांना मतदारसंघात कुणी विचारत नाही. आमदार निवडून आलेल्या लोकांचा हा पक्ष आहे. विजय आमदारांची ही मोळी आहे, त्याची दोर शरद पवारांकडे आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या