निखिल चव्हाण, प्रतिनिधी ठाणे, 27 नोव्हेंबर : कळव्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. या जलकुंभाचा लोकपर्ण सोहळा शनिवारी (27 नोव्हेंबर) संपन्न झाला. यावेळी या जलकुंभाला मिळणाऱ्या निधीवरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि स्थानिक शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. आपण कळवा-मुंब्रातील विकासकामांसाठी ठाणे महापालिका, राज्य सरकारकडे वारंवार निधीची मागणी केली. पण आता कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे असल्याने निधी मिळणार, असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला. कळवा, खारेगाव या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यातच या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या घरात वेळेवर पाणी पुरवठा होत नाही, हीच बाब लक्षात घेता स्थानिक आमदार मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक यांनी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत असताना दिसून आले होते. मात्र निधी अभावी विकास कामे होत नसल्याने मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याप्रसंगी नाराजी व्यक्त केली. हेही वाचा : स्टार लोकांना लुबाडणारी शिल्पा, तब्बल 100 कोटींपेक्षाही मोठी फसवणूक
“कळवा, मुंब्रामधील विकास कामासाठी गेली 2 वर्ष निधी मिळत नाहीय. निधी मिळावा म्हणून मी राज्य सरकार, महापालिकेच्या मागे लागला आहे. मात्र आता कुठेही जाण्यात काही अर्थ नाही. कारण निधी देण्यासाठी पोरासाठी बाप कधीही तयार असतो”, असा टोमणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सेना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
मंत्री आव्हाड यांच्या वक्तव्याला श्रीकांत शिंदेंनीही उत्तर दिलं. “गेली दोन वर्षे महापलिकेत निधी उपलब्ध नाही, पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यामुळे या कामांसाठी नगरविकास विभागाने निधी दिला आहे. आपल्याला आवश्यकता असल्यास नक्कीच आपल्याला नगरविकास विभाग निधी दिल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. हेही वाचा : ‘तो दिवस लांब नाही, भाजपचे सरकार येणारच’, आता दरेकरांचे सत्ताबदलाचे संकेत?
श्रीकांत शिंदे यांच्या विधानाला जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा उत्तर दिलं. “गेली दोन वर्षे मागे लागलोय. मला 25 कोटी रुपये निधी द्या. आज देतो, उद्या देतो, फाईल गेलेली आहे, असं करत करत राहिले. त्यामुळे यांनाच मंत्री बनवून ठेवा एवढीच विनंती आहे”, असा मिश्किल टोला आव्हाडांनी लगावला