कोल्हापूर, 12 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेमध्ये मध्यरात्री काही अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे. कोणतीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसवण्यात आल्यामुळे प्रशासनाने हरकत घेतली आहे. बांबवडे इथं 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री काही अज्ञात तरुणांनी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवला. सकाळी जेव्हा चौकात गर्दी झाली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला. शिवरायांचा पुतळा चौकात बसवण्यात आल्यामुळे शिवभक्तांनी आनंद साजरा केला. अनेक शिवभक्तांनी परिसरात एकच गर्दी केली होती.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत शेकडो शिवभक्त चौकात गोळा झाले होते. पोलीस प्रशासनाने पालिकेची परवानगी घेऊन पुतळा बसवावा अशी विनंती शिवभक्तांना केली आहे. परंतु, शिवभक्तांनी कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांचा पुतळा चौकातून हटवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. पुतळ्याचे आम्ही संरक्षण करू यावर शिवभक्त ठाम आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवभक्तांना विनंती केली आहे. परंतु, यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.