विजय कमळे पाटील जालना, 3 जानेवारी: देव तारी त्याला कोण मारी, असं म्हटलं जातं. पण असं खरोखरच्या आयुष्यात घडतं तेव्हा तो चमत्कारच वाटतो. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी असाच प्रकार झाला. भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतला. गाडी जळत असताना ज्यांनी पाहिली, त्यांचा आता विश्वास बसणार नाही, पण काही क्षणात गाडीतलं सगळं कुटुंब बाहेर पडल्याने मोठी हानी टळली. 2 महिन्यांच्या बाळासह पाच जण गाडीत होते. एकाही सदस्याला या घटनेत कुणालाही हानी झालेली नाही. अंबड तालुक्यातील वडीगोद्री जवळील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी भरधाव स्कॉर्पिओ कारने अचानक पेट घेतला. पाहता-पाहता काही क्षणातच ही स्कॉर्पिओ कार जळून खाक झाली, पण गाडीत असलेलं इनामदार कुटुंबीय सुखरूप बचावलं वडीगोद्रीजवळ केज (जि. बीड ) येथील रहिवासी खलील इनामदार हे आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांसह केजहून औरंगाबादकडे गाडीने जात होते. तेव्हा सायंकाळी या स्कार्पिओ गाडीमधून अचानक धूर यायला लागला. इंजिनमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं, तेव्हाच खलील इनामदार यांनी गाडी थांबवून गाडीचं इंजिन तपासण्यासाठी बोनेट उघडलं तेव्हा अचानक इंजिनाने पेट घेतला. प्रसंगावधान राखून गाडीतून सगळेच तातडीने खाली उतरले. खलील इनामदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी माती टाकून पेटलेली गाडी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीने जास्त पेट घेतल्यामुळे गाडी विझजवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. इंधनाची टाकी पेटली की स्फोट होईल हे लक्षात येताच इनामदार कुटुंबातले सदस्यांनी तिथून पळ काढला. गाडीतलं साहित्य आणि कागदपत्रं काढण्यास वेळ मिळाला नाही, पण माणसं सगळी वाचली. दोन महिन्यांच्या बाळालाही सुखरूप वाचवता आलं. कारण जमलेल्या नागरिकांनीही दुरून पाणी टाकून गाडी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिलतकुमार बल्लाळ यांनी घटना स्थळी भेट देऊन गाडी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.