अरविंद केजरीवाल
मुंबई, 17 मे : सध्या महाराष्ट्रात भाकरी फिरवणे हा शब्द प्रचलित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा भाकरी फिरवण्याचे संकेत दिले. नंतर उद्धव ठाकरे यांनीही हीच भाषा केली. आता आम आदमी पक्षाने देखील महाराष्ट्रात नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहेत. आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विद्यमान राज्य समिती आणि सध्याच्या संघटनेच्या प्रादेशिक समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित केल्या आहेत. लवकरच नवीन समित्यांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या प्रीती शर्मा मेनन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची पुनर्बांधणी करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई प्रदेश समिती विसर्जित केलेली नसून ती कार्यरत असल्याचे मेनन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपच्या मुंबई युनिटने ट्विट केले आहे की, “आप महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढणार आहे. आज मुंबई झोन समित्या वगळता महाराष्ट्रातील सर्व स्तरीय समित्या विसर्जित करण्याची घोषणा केली. हा निर्णय महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेईल आणि आम्ही त्याचे स्वागत करतो.”
विशेष म्हणजे आम आदमी पक्ष संघटनेच्या विस्ताराकडे लक्ष देत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. नुकत्याच झालेल्या एमसीडी निवडणुकीत पक्षाने भाजपचा पराभव केला. त्याचवेळी जालंधर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीतही आम आदमी पक्षाने बाजी मारली. पक्षाला सातत्याने मिळत असलेले यश पाहून केंद्रीय नेतृत्वही उत्साहात आहे. वाचा - महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? प्रकाश आंबेडकरांनी फोडली राष्ट्रवादीतली बातमी या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे आम आदमी पक्षाची नजर आहे. त्यादृष्टीने पक्षाने तयारीही सुरू केली आहे. दिल्ली आणि पंजाबच्या बाहेर पक्षाने आपली मुळे पसरायला सुरुवात केली आहेत. महाराष्ट्रात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचवेळी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. बीएमसीच्या निवडणुकीची घोषणा व्हायची आहे. अशा स्थितीत आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील संघटनेवर नव्या दृष्टिकोनातून काम करणार आहे.