JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 72 तासांची चूक टाळण्यासाठी भाजपची यंदा वेगळी रणनिती? प्लान B देखील तयार!

72 तासांची चूक टाळण्यासाठी भाजपची यंदा वेगळी रणनिती? प्लान B देखील तयार!

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election) महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेची मतं मोठ्या प्रमाणावर फुटली आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election) महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेची मतं मोठ्या प्रमाणावर फुटली आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या सूरतमध्ये आहेत, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एवढे आमदार असतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पक्षांतर बंदी कायदा काय आहे? आमदार आणि खासदारांची होणारी अशी फाटाफूट रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन-तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. शिवसेनेच्या आमदारांची संख्या ही 56 होती पण रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही संख्या आता 55 आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचं असेल तर 55 च्या दोन-तृतियांश म्हणजेच 37 आमदारांचं पाठबळ एकनाथ शिंदे यांना गरजेचं आहे. शिंदे यांच्या समर्थनाथ 37 आमदार असतील तर त्यांना वेगळा गट तयार करता येऊ शकेल किंवा ते इतर कोणत्या पक्षात प्रवेश करू शकतात, यामुळे कोणत्याच आमदाराची आमदारकी धोक्यात येणार नाही, पण हा आकडा कमी झाला तर मात्र सगळ्या आमदारांना त्यांची आमदारकी सोडावी लागेल आणि पुन्हा एकदा या मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल. काँग्रेस आमदारही नॉट रिचेबल? एकीकडे शिवसेनेत भूकंप झालेला असतानाही काँग्रेसचे 5 आमदार नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचेही 3 आमदार फुटले, एवढच नाही तर काँग्रेसच्या दोन उमेदवारांसाठीच काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंगही केलं. 72 तासांची चूक टाळण्यासाठी भाजपची खेळी? महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या भाजपचे 106 आमदार आहेत, तर अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाच्या आमदारांची संख्या 29 आहे. महाराष्ट्र विधानसभेचं संख्याबळ 288 आहे, पण रमेश लटके यांचं निधन तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे ही संख्या 285 एवढी झाली आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 143 एवढा झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जर शिवसेनेचे दोन-तृतियांश आमदार आले नाहीत, तर या जागांसाठी पुन्हा निवडणुका होतील. पुन्हा निवडणुका झाल्या आणि यातल्या निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या कमी होण्याचा धोका टाळण्यासाठी भाजपने काँग्रेस आमदारांना प्लान बी मध्ये ठेवलं आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. 2019 साली महाराष्ट्रात सत्ता नाट्य सुरू असताना देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण 72 तासांमध्ये अजित पवार स्वगृही परतले. यानंतर राज्यात महाविकासआघाडी सरकारची स्थापना झाली. 2019 वेळी झालेली चूक टाळण्यासाठी भाजप यंदा ताकही फुंकून पित असल्याचं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या