रत्नागिरी 23 मे : बहुचर्चित अशा रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचे जेष्ठ पुत्र निलेश राणे यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या विनायक राऊतांनी मिळवलेला विजय हा नारायण राणेंसाठी मोठा धक्का आहे. तर, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर हे देखील रिंगणात उतरले होते. भाजपच्या कोट्यातून राज्यसभा खासदार असलेल्या नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत माजी खासदार निलेश राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. पण, दुसऱ्यांदा कोकणच्या जनतेनं त्यांना नाकारलं आहे. सुरूवातीपासूनच विनायक राऊत हे आघाडीवर होते. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर लोकसभेच्या रिंगणात असले तरी नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वाचं लक्ष रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाकडे होतं. 2009 मध्ये निलेश राणेंचा विजय रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. 2009 मध्ये काँग्रेसच्या निलेश राणेंनी विजय मिळवला. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवारावरून वाद काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यावर सनातन संस्थेशी संबंध असल्याचे आरोप झाले. त्यावरून वादही निर्माण झाला. पण, काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे या पक्षाने इथून आपला उमेदवार बदलला नाही. राजकीय इतिहास 2009 मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग या नव्याने बनलेल्या मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी निलेश राणे हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये विनायक राऊत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी निलेश राणे दुसऱ्या क्रमांकावर होते. आधी आमदार, मग खासदार शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत मुंबईत पार्ले विधानसभा मतदारंघातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेतही काम केलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले. राणेंची प्रतिक्रिया दरम्यान, या पराभवानंतर निकालात फेरफार झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. तसंच हा निकाल अपेक्षित नव्हता. तो एक्झिट पोलनुसार लागल्याचं राणे यांनी म्हटलं. शिवाय, यापुढे निवडणूक लढवायची की नाही याचा विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी दिली. VIDEO : उद्धव ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ची उडवली खिल्ली, ‘मातोश्री’वर एकच हास्यकल्लोळ