कोल्हापूर, 28 डिसेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल मी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरला आल्यानंतर कसे स्वागत होणार हे पाहावे लागेल. मात्र त्याआधीच कोल्हापूरमधील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी भाजपमधील कथित अंतर्गत वादावर भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून कोथरूड मतदार संघ निवडला त्याच वेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा ते कोल्हापूरला येणार असल्याचं सांगत आहेत. यावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातीलच असल्याचा टोला लगावला आहे. विरोधकांना सांगायचं आहे म्हणाले आणि त्यांनी फडणवीस यांचं नाव घेतलं त्यामुळे चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना सांगत असावेत की मी कोल्हापूरला जात आहे, अशी टोलेबाजीही सतेज पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी नाही? कोल्हापूरमध्ये काही दिवसांतच ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. राज्यात एकत्रित सत्ता स्थापन केलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष ही निवडणूक एकत्र लढवणार का, या प्रश्नावर सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ‘तीनही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या मानसिकतेत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतंत्र लढण्याबाबतची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षही वेगळं लढण्याच्या विचारात आहे,’ असं म्हणत सतेज पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मित्रपक्ष स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर हे तीनही पक्ष एकत्र येतील, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.