रत्नागिरी, 25 एप्रिल : कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे. ट्रक चालकाला चक्कर आली आणि भयंकर घडलं, VIDEO पाहून अंगावर येईल काटा दरम्यान, राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिकची पोलीस कुमक रत्नागिरीत मागवण्यात आलीय. यामध्ये शेकडो अधिकारी आणि 1800 पोलीस कर्मचारी असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण व माती परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच 3 एस आर पी एफ च्या तुकड्या देखील आज रत्नागिरीत दाखल होणार आहेत. राजापूर येथील स्थानिकांनी रिफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. बारसू व इतर गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू झालं आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग, समुद्र, फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केलीय. कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून यामुळे प्रकल्पाला विरोध केला जात आहे. बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. सर्वेक्षणाबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी महसूल अधिकारी, राजापूरचे तहसीलदार, प्रांतअधिकारी बारसू गावात दाखल झाले आहेत.